
देवळी सत्यदूत वृत्त.अमोल ठाकरे

वर्धा नगर परिषद अध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ यांनी आज शहरातील विविध बाजारपेठी व नागरी समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटीची मोहीम राबवली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, ठाकरे मार्केट, सोशलिस्ट चौक, निर्मल बेकरी परिसर, अंबिका हॉटेल परिसर व इतर विविध बाजारपेठी भागांची सविस्तर पाहणी केली.अध्यक्ष महोदय यांनी मैदानात उतरून जनतेसाठी विकास कामे करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष निरीक्षण केले. पाहणी दरम्यान त्यांनी बाजारपेठीतील वाढते ट्रॅफिक जाम, अतिक्रमण आणि कचरा प्रदूषण ही प्रमुख समस्या बारकाईने नोंदवल्या. नागरिक आणि व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.पाहणी संपल्यानंतर अध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, *“ही आमची शहरं आहे आणि ती स्वच्छ, सुस्थितीत ठेवणे ही आमची जबाबदारी आहे.”* त्यांनी लवकरात लवकर ट्रॅफिक कोंडी, अतिक्रमण हटविणे आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मैदानातील कामकाज सुरू ठेवण्याचे त्यांनी जाहीर केले.नागरिकांनी या पाहणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अध्यक्षांच्या या सक्रिय भूमिकेचे स्वागत केले आहे. नगर परिषद प्रशासन लवकरच या समस्यांवर मात करण्यासाठी कार्यवाही सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.







