
देवळी सत्यदूत वृत्त प्रतिनिधी तुषार रेड्डीवार

वर्धा शहरातील पोलीस कवायत मैदानाचे नुतणीकरण करताना नागपूर व चंद्रपूरच्या धर्तीवर अत्याधुनिक सिंथेटीक ट्रॅकसह विविध खेळांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. मैदानावर वेळप्रसंगी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता यावेत यासाठी प्रेक्षक गॅलरी, विशेष आसन व्यवस्था तसेच आधुनिक सुविधांचा समावेश असलेला आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.पोलीस कवायत मैदानाच्या नुतणीकरण कामाचा आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस उपअधीक्षक (गृह) पुंडलीक भटकर, स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद चौधरी, सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे आदी उपस्थित होते.पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची सर्व चाचणी एकाच ठिकाणी घेता यावी, यासाठी 400 मीटर धावपट्टी, 100 मीटर रनिंग ट्रॅक, बास्केटबॉल मैदान, व्हॉलीबॉल मैदान, जिम तसेच इतर क्रीडा सुविधांचा समावेश आराखड्यात करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय मोठ्या स्पर्धा आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज मंच उभारण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.मैदान परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वतंत्र प्रसाधनगृहे व शौचालये उभारण्यासोबत संपूर्ण विद्युत व्यवस्था सोलर ऊर्जेवर कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. प्रेक्षक गॅलरीवर सोलर पॅनल बसवून ऊर्जा निर्मिती करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.यावेळी आर्किटेक्टकडून तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे पॉवर पॉईंट सादरीकरण करण्यात आले. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.







