पेन व प्रेरणादायी प्रतिमा भेट देत रविंद्र पारीसे यांचा वाढदिवस साजरा

देवळी सत्यदूत वृत्त.रेणूका दूरबुडे देवळी

जि. वर्धा येथील युवा उद्योजक तथा पत्रकार रविंद्र पारीसे यांचा वाढदिवस आई रेणुका चिवडा सेंटर येथे अत्यंत साधेपणाने आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी पारंपरिक सत्कार साहित्य किंवा आडंबरपूर्ण भेटवस्तूंऐवजी पेन तसेच राजमाता जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा भेट देऊन त्यांचा गौरव केला. पत्रकारितेच्या क्षेत्रात पेन हे केवळ लेखनाचे साधन नसून सत्य, न्याय आणि लोकशाहीचे प्रभावी शस्त्र मानले जाते. समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे, अन्यायाला वाचा फोडण्याचे आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य पेनमध्ये असते.

त्यामुळे युवा उद्योजक व पत्रकार रविंद्र पारीसे यांना पेन भेट देऊन त्यांच्या लेखणीतून समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे घडत राहावे, अशी भावना व्यक्त करण्यात आली. तसेच राजमाता जिजाऊ मासाहेब यांची प्रतिमा मातृत्व, संस्कार, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रतीक मानली जाते. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा आजही समाजासाठी आदर्श ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शौर्य, न्यायनिष्ठा, स्वाभिमान आणि लोककल्याणकारी नेतृत्वाचे प्रतीक आहे. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमा भेट देऊन त्यांच्या विचारांचा आदर्श जीवनात जपण्याचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी सर्व पत्रकार सत्तार शेख, संतोष तुरंक, समीर शेख, गणेश शेंडे आणि सचिन वैद्य उपस्थित होते. त्यांनी रविंद्र पारीसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पत्रकारिता आणि उद्योजकीय क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले. तसेच समाजहिताच्या कार्यात त्यांचे योगदान अधिक वृद्धिंगत व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. साधेपणा, विचारांची समृद्धी आणि प्रेरणादायी संदेश यांचा संगम असलेला हा वाढदिवस सोहळा उपस्थितांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरला. पेन आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांच्या माध्यमातून ज्ञान, संस्कार, कर्तृत्व आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरला. शिवाजी महाराज प्रतिमा भेटीचा सचिन वैद्य यांचा अलौकिक उपक्रम नगर परिषद देवळी माजी नगराध्यक्ष गौतम पोपटकर यांना दिनांक ०१/०६/२०२६ रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जिजामाता , छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट व पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या. यामध्ये सचिन वैद्य , रवींद्र पारिसे , कु. स्वराज वैद्य उपस्थित होते.







