ग्रामस्थांचा संताप, कारवाईची मागणी

देवळी सत्यदूत वृत्त.
सचिन वैद्य

भिडी (ता. देवळी) : गावालगत सुरू करण्यात आलेल्या काँक्रीट मिक्सर प्लांटमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त झाले असून, आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन न करता हा प्लांट सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्लांटमधून होणाऱ्या धूळ व प्रदूषणामुळे शेतपिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असून, अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामपंचायत हद्दीत कोणताही औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC), स्थानिक कर भरणा तसेच संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असते. मात्र संबंधित कंपनीने ग्रामपंचायतीची ना हरकत न घेता तसेच ग्रामपंचायतीचा कर न भरताच प्लांट सुरू केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याशिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन झाले आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
यासंदर्भात ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा खनिकर्म विभाग तसेच इतर संबंधित विभागांकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शेतपिकांचे नुकसान, वाढता प्रदूषणाचा धोका
प्लांटमधून उडणारी धूळ, वाळू व गिट्टीमुळे परिसरातील शेतीपिकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. धुळीमुळे पिकांची गुणवत्ता व उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
महामार्गालगत अपघाताची भीती
सदर प्लांट यवतमाळ महामार्गालगत असल्याने जड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीवर ताण वाढत असून अपघाताचा धोका निर्माण झाल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी विविध विभागांकडे तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नियमांचे उल्लंघन होत असताना संबंधित विभाग मौन का बाळगत आहेत, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.
अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
स्वप्निल फाटे, सचिव, ग्रामपंचायत भिडी म्हणाले, “कंपनीने ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही. तसेच ग्रामपंचायतीचा करही भरलेला नाही. प्लांटमुळे प्रदूषण वाढून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे.”
आकाश राठोड, प्रशासक, ग्रामपंचायत भिडी यांनी सांगितले, “ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असते. मात्र येथे नियमांचे उल्लंघन झाल्याची बाब समोर आली आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.”
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) वर्धा जिल्हा उपाध्यक्ष व शेतकरी पारस चोरे यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित कंपनीवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “भिडी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरणाच्या हिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. आवश्यक परवानग्यांशिवाय प्लांट सुरू असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
राजेंद्र रोकडे, शेतकरी, यांनी सांगितले,भिडीतक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. नियमबाह्य प्लांटमुळे ग्रामपंचायतीचा हक्काचा करही मिळालेला नाही.
सध्या या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट असून प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.







