वर्धा जिल्ह्यातील पुलगाव-आर्वी मार्गावर दुचाकी धडकेत तीन व्यक्ती जागीच मृत झाले. यात योगेश मेश्राम, देवेंद्र दरणे, आणि गंगाधर दरणे यांचा समावेश आहे.

लग्नपत्रिका देऊन परतताना काळाने घातला घाला
देवळी सत्यदूत वृत्त.
सचिन महाजन वर्धा प्रतिनिधी

पुलगाव/विरूळ (Pulgaon Accidental Death) : वर्धा जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला. कुणी काम आटोपून घरी परतत होते, तर कुणी नातलगांना लग्नाचे आमंत्रण देऊन आनंदाने गावाकडे निघाले होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पुलगाव-आर्वी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसर सुन्न झाला असून तीन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Pulgaon Accidental Death) मृतांमध्ये योगेश रामकृष्ण मेश्राम (रा. सालफळ), देवेंद्र त्र्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे (दोघेही रा. दरणे-टाकळी) यांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सालफळ येथील ग्रामपंचायत कर्मचारी योगेश मेश्राम हे एमएच 40 बीयू 2274 क्रमांकाच्या दुचाकीने देवळी येथे पेपर संपवून आपल्या गावी परतत होते. तर देवेंद्र दरणे आणि गंगाधर दरणे हे एमएच 32 एव्ही 8455 क्रमांकाच्या दुचाकीने रोहणा येथे नातलगांकडे लग्नपत्रिका देऊन आनंदाच्या वातावरणात परतीच्या प्रवासाला निघाले होते. दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. (Pulgaon Accidental Death) धडक एवढी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणांत आनंदाचा प्रवास मृत्यूच्या काळोखात बदलला.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेल्या दुचाकी, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आणि आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या दुर्दैवी घटनेमुळे सालफळ आणि दरणे-टाकळी गावांमध्ये शोककळा पसरली असून हसत-खेळत घराबाहेर पडलेले तिघेही पुन्हा कधीच परतणार नाहीत, या वास्तवाने नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत.







