देवळी सत्यदूत वृत्त.

जि.प.प्राथमिक शाळा कारला येथे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी व मूल्यांची रुजवणूक व्हावी या उद्देशाने ‘दुर्गुणांची होळी’ हा नाविन्यपूर्ण व संस्कारक्षम उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत राग, चिडचिड, मत्सर, मोठ्यांचा आदर न करणे, मोबाईलचा अतिवापर, कॉपी करणे, आळस, शिस्तभंग आदी दुर्गुणांची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील एखादा दुर्गुण लिहून तो होलिकेत अर्पण केला आणि “या दुर्गुणांना आज स्वाहा” असा संकल्प व्यक्त करत होलिका दहन केले.कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष . मनोज पुरके, उपाध्यक्ष सीमाताई कंडे, सदस्य श्री. गंगाधरभाऊ राऊत व नारायण खंडागळे तसेच मूल्यवर्धन तालुका समन्वयक मा. अनमोल शंभरकर सर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता भांडवलकर व शिक्षिका कु. चेतना खक्के यांनी होलिकेचे पूजन करून विद्यार्थ्यांना दुर्गुण येथेच सोडून चांगले गुण आत्मसात करण्याचा संदेश दिला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांची वाढ व संवर्धन करण्याचा तसेच दुर्गुणांना कायमचा निरोप देण्याचा संकल्प केला. संस्कारांची अशी होळी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







