देवळी सत्यदूत वृत्त.अमोल ठाकरे

मराठा महासंघाच्या वतीने दरवर्षी बालगृहात शिवजयंतीच्या पर्वावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीसुद्धा “शिवराय आणि गडकिल्ले” हा विषय घेऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात शिवरायांचे जीवनचरित्र बाल गृहातील बालकांनी परिपूर्णतेणे कागदावर साकार केले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनातील वैविध्यपूर्ण प्रसंग साकारतांना “गड आला पण सिंह गेला” तसेच “छत्रपती शिवाजीराजे आणि युवराज संभाजी राजे यांची गडावरील भेट”याचे सजीव चित्रण बालगृहातील बालकांकडून केले गेले.कार्यक्रमाच्या सुरवातीस छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे उपक्रम संयोजक राजीव वानखेडे,संचालक इंदुमती वानखेडे फाउंडेशन,वर्धा यांनी “शिवरायांनी स्वराज्य प्राप्ती करिता सातत्यपूर्णतेणे कार्य केले तीच ऊर्जा तुम्ही मनात बाळगा हे सांगून शिवरायांचा जीवनप्रवास उलगडला”.कार्यक्रमाचे अतिथी मराठा महासंघ विदर्भ सरचिटणीस दीपक कदम,विभागीय उपाध्यक्ष रोहिणी बाबर,सेवाग्राम पब्लिक स्कूलच्या प्राचार्या भाग्यश्री वानखेडे,लीनेस क्लब अध्यक्षा धनश्री भांडेकर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.

या प्रसंगी बालगृह अधीक्षक सुजाता देशमुख यांनी बालगृहातील बालकांचे अंगभूत गुण आणि त्याच्यात असलेल्या वैविध्यपूर्ण कला तसेच त्यांचे दैनंदिन उपक्रम या बाबतची संपूर्ण माहिती देत मराठा महासंघ समाजातील या उपेक्षित बालकांकरिता नेहमीच क्रियाशील असतो असे सांगितले.बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी बालकांनी शिवरायांबद्दलचे आपले विचार मांडत,कवितांचे सादरीकरण सुद्धा केले. स्पर्धेचे परीक्षण उदयोन्मुख बाल चित्रकार श्रीमयी बाबर हिने करतांनाच बालकांना चित्रातील बारकावे समजावून सांगितले.राजीव वानखेडे मित्रपरिवार यांच्या वतीने स्पर्धेतील विजयी बालकांना प्राप्त क्रमांकानुसार 5 मोठ्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले तसेच सर्व मुलांना व्यक्तीगत भेटवस्तू आणि मैदानी खेळण्याचे साहित्य प्रदान केले गेले.मराठा महासंघ जिल्हाध्यक्षा मनीषा निकम यांनीही बालकांच्या कलागुणांचे कौतुक करीत नाश्त्याचें वितरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवती अध्यक्षा मोनाली मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्षा कुंदा घाडगे यांनी केले.कार्यक्रमाच्या आयोजनात जिल्हा सचिव माधुरी मोहिते, शहर अध्यक्षा साधना पवार,सदस्या नलिनी धानोरकर आणि लीनेस क्लब सचिव नीलिमा गोटे यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी बालनिरीक्षण गृह कर्मचारी वृंद उपस्थित होता.






