देवळी सत्यदूत वृत्त.शंकर परचाके
वर्धा — खेळ हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतो तसेच शारीरिक ताकद वाढवतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर खेळाचे विशेष महत्त्व असून तो व्यक्तिमत्त्व घडविण्यात मोलाची भूमिका बजावतो.खेळातील यशासोबत राष्ट्रीय अभिमान जोडलेला असतो. खेळ जात, पंथ आणि धर्म यापलीकडे जाऊन देशाला एकत्र बांधण्याचे काम करतात तसेच आनंदी व निरोगी समाजनिर्मितीत हातभार लावतात. भारतात मोठ्या प्रमाणावर क्रीडा प्रतिभा उपलब्ध असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या प्रतिभेला जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यास तयार करता येते.विविध खेळांमध्ये सहभागी झाल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यात सकारात्मक सुधारणा होते. खेळ हा खरोखरच जीवनाचा आवश्यक भाग आहे; त्याशिवाय जीवन अपूर्ण वाटू शकते. त्यामुळे खेळ जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्य राखीव पोलीस बल, नागपूरचे विशेष महानिरीक्षक निसार तांबोली यांनी केले.ते राष्ट्रीय आंतरशालेय कराटे क्रीडा स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.यावेळी स्पोर्ट कराटे असोसिएशन, वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही, नागपूरचे माजी पोलीस उपआयुक्त चंद्रकांत उदगीरकर, जमील अहमद, शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय सचिव किरण फुलझेले, अविनाश दुपारे, उपविभागीय अभियंता प्रभाकर हांडे, अब्दुल गनी, इव्हेंट डायरेक्टर संदीप निसाल, स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वर्धा जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव मंगेश भोंगाडे तसेच गेंशुर्यू कराटे असोसिएशनचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी व संरक्षक निलेश राऊत हे प्रमुख उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू पियुष अनुज सिंह, नैतिक निलेश राऊत आणि देवांशू प्रकाश लाखे यांचा पदक, प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.






