देवळी सत्यदूत वृत्त.
रेणुका दूरबुडे
देवळी: दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना अनेकदा शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. मात्र प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कामे किती सुलभ होऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण देवळी तहसील कार्यालय येथे पाहायला मिळाले.
प्रहार अपंग क्रांती संघटनेने काही गरजू दिव्यांग बांधवांची यादी पुरवठा विभागाकडे सुपूर्द केली. पुरवठा निरीक्षक शिवरकर मॅडम यांनी तत्परतेने कार्यवाही करत सर्व पात्र लाभार्थ्यांचे अंत्योदय रेशनकार्ड तयार करून ती कार्डे संघटनेकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे, लाभार्थ्यांना कोणत्याही अतिरिक्त फेऱ्या माराव्या लागल्या नाहीत.
यानिमित्ताने तहसील कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार समर्थ क्षीरसागर तसेच दिव्यांग मानधन १५०० वरुण २५०० करण्यास ज्या तांत्रिक अडचणी ताबडतोब दूर करुन लाभ मिळवून देण्यास मदत केली त्या नायब तहसीलदार जाधवर मॅडम, पुरवठा निरीक्षक शिवरकर मॅडम तसेच माजी नगराध्यक्ष अब्दुल जब्बार तंवर यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशनकार्डांचे वितरण करण्यात आले. संघटनेच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
उर्वरित रेशनकार्डे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली. या उपक्रमासाठी प्रहार अपंग क्रांतिचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुऱ्हाटकर यांनी विशेष परिश्रम घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली तसेच अमोद क्षीरसागर, सचिन पोहाणे, नरेश वैद्य, पवन सुरकार, सुभाष रेवतकर आणि ज्ञानेश्वर गीरसपुंजे यांनी मेहनत घेतली.
या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला असून प्रशासन आणि सामाजिक संघटनांच्या समन्वयातून समाजहिताची कामे अधिक प्रभावीपणे कशी करता येतात, याचा आदर्श निर्माण झाला आहे.






