देवळी सत्यदूत वृत्त.
हर्षाली सातघरे
हिंगणघाट:- कोरोना काळात राज्यातील बस वाहतूक पूर्ण बंद होती. कोरोनाचा प्रादूर्भाव संपल्यानंतर लगेचच एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी दीर्घ काळ संप पुकारला. दरम्यान सहा महिन्यांच्या काळात राज्यातील जनता बेहाल झाली होती.कालांतराने पगारवाढ झाल्याने हा संप मागे घेतला.मात्र,तेव्हापासून विस्कळीत झालेली बससेवा अद्याप सुरळीत झालेली नाही.खेड्यांमध्ये सध्या खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून केवळ आठवडी बाजाराच्या दिवशी ही सुविधा उपलब्ध असते.त्यामुळे आजारी,वयोवृद्ध नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधाही मिळणे कठीण झाले आहे.शाळा,महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असून प्रचंड खर्च करून खासगी वाहतुकीने परगावी जागे लागत आहे.खासगी बस वाहतुकीवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने वारेमाप लूट सुरू आहे. तर खेडोपाडी सुरू असलेल्या फेऱ्या तोट्याच्या नावाखाली बंद केल्याने ग्रामीण भागात प्रचंड हाल सुरू आहेत.देशातील सर्वोत्कृष्ट महामंडळाचा सर्वाधिक पतनाचा काळ सध्या सुरू असून गेल्या पाच वर्षांत ते वेगाने सुरू आहे.राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासासाठी कधीकाळी सेवेस तत्पर असलेली एसटी महामंडळाची बस सध्या खेड्यापाड्यातून गायब झाली आहे.तर लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी बसेसऐवजी खासगी बस धावत आहेत.
गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण बट्टयाबोळ झाला असून,त्याकडे लक्ष देण्याऐवजी दरवाढ करून जखमेवर मीठ चोळले आहे.चहांद परसोडा,येवती,धानोरा, वनोजा,चिखली,अंतरंगाव,कोपरी या सर्व गावांना धान्य व इतर मार्केट आणि शाळा महाविद्यालये असल्याने लांब वरून प्रवास करावा लागत आहे,कोरोना काळापासून बंद असलेल्या किंवा तोट्याचे कारण सांगून बंद केलेल्या अनेक एसटी महामंडळ बसेस पूर्ववत चालू कराव्यात,अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवासी,विद्यार्थी आणि सर्व गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
बाॅक्स
‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ असे घोषवाक्य होते. विनाअपघात प्रवास आणि महिला सुरक्षेसाठी ओळख असलेली बससेवाच बंद झाल्याने राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सायंकाळच्या टप्प्यात महाविद्यालयातून घरी जाणाऱ्या मुलींना पायी जावे लागत आहे. तर रात्री उशिरा परतणाऱ्या महिला आणि मुलींना जीव मुठीत घेऊन पायपीट करत घर गाठावे लागत आहे.
जितेंद्र खोडे (वनोजा)
ग्रामस्थ



