मराठी राजभाषा गौरव दिन राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय
शिक्षक महासंघ वर्धाचे आयोजन
देवळी सत्यदूत वृत्त.शंकर परचाके
वर्धा :- प्रतिनिधी – अमूर्ताला मूर्त रूप देणारी आणि अमृताचाही पैजा जिंकणारी मराठी भाषा ही अथांग सागर आहे . हा सागर बनतो तिच्या सरिता रुपी बोलींमुळे. आपल्या भाषेला शेकडो बोलींची वैभवी परंपरा लाभली आहे. आणि ती पुढे नेण्याचे कार्य आजचे साहित्यिक अग्रक्रमाने करीत आहेत हे उल्लेखनीय आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ . राजेंद्र मुंढे यांनी केले . डॉ . राजेंद्र मुंढे कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर ‘ कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा गौरव दिना निमित्त केशरीमल कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा येथे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयिन मराठी विषय शिक्षक महासंघ वर्धा जिल्हाच्या वतीने आयोजित समारंभात प्रमुख वक्ते म्हणून संबोधित करताना केले . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य पद्माकर बाविस्कर, कार्याध्यक्ष माध्यमिक मराठी अध्यापक मंडळ वर्धा जिल्हा उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. राजेंद्र मुंढे, वर्धा जिल्हातील साहित्यक्षेत्रात कवी ,लेखक,समीक्षक म्हणून ख्याती प्राप्त साहित्यिक उपस्थित होते, सोबतच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.कुंडलिक राठोड सचिव महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ वर्धा जिल्हा उपस्थित होते. डॉ. मुंढे पुढे म्हणाले , समृद्ध बोलीचा वारसा मराठी मुलखातील ग्रामीणाकडूनच जपला जातो आहे . म्हणूनच आतां बोली जपण्याचा वसा सर्व मराठी जणांनी घेतला पाहिजे, तरच मराठी येणाऱ्या काळात टिकेल आणि ती ज्ञानभाषा होऊ शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रास्ताविकातून प्रा.कुंडलिक राठोड यांनी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची भूमिका व्यक्त करून मराठी भाषा संवर्धनाची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.पद्माकर बाविस्कर यांनी मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये अनिवार्य व सक्तीची व्हावी त्यासाठी मराठी विषय शिक्षक महासंघाची दिशा कशी असावी त्याबद्दल मार्गदर्शन केले….. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अमित चिनेवार यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रा.शैलेंद्र निकोसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.अरविंद राठोड,प्रा.पुरुषोत्तम कावळे,प्रा.भारत जाधव,प्रा. सौ . देशमुख ,प्रा. चाफले मॅडम आणि कार्यकारिणीतील सर्व सभासदानी प्रयत्न केले.याप्रसंगी मराठी भाषा विषय शिक्षक आणि मराठी भाषेवर प्रेम असणारे विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.





