कंपनीच्या काळ्या राखेने शेती आणि आरोग्य धोक्यात; · ७ दिवसांत प्रदूषण न थांबल्यास आंदोलनाचा इशारा

देवळी सत्यदूत वृत्त.रेणुका दुरबुडे देवळी

(प्रतिनिधी):येथील औद्योगिक वसाहतीमधील ‘SMW इस्पात’ (स्टील व पॉवर प्लांट) मधून बाहेर पडणाऱ्या घातक काळ्या राखेने देवळी शहरासह संपूर्ण परिसर वेढला आहे. या जीवघेण्या प्रदूषणाविरोधात आज किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देवळीकर नागरिकांनी एल्गार पुकारला. काळी छत्री, काळा मास्क व काळ्या फिती बांधून निषेध करीत शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य मोर्चाने थेट एमआयडीसीतील महालक्ष्मी (SMW) कंपनीवर धडक दिली आणि व्यवस्थापनाला धारेवर धरले.गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या चिमणीतून रात्रीच्या वेळी जाणीवपूर्वक प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवून मोठ्या प्रमाणात काळी राख सोडली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही राख घरांच्या छतावर, अंगणात, रस्त्यावर आणि विशेषतः सोलर पॅनलवर साचल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतीवरही या राखेचा ‘विषारी थर’ साचल्याने उभी पिके करपून जात असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. राखेतील कार्बन आणि लोखंडाचे सूक्ष्म कण श्वसनावाटे शरीरात जात असल्याने नागरिकांना दमा, फुफ्फुसाचे विकार आणि डोळ्यांच्या जळजळीचा त्रास होत आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारही या प्रदूषणामुळे आजारी पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.किरण ठाकरे व देवळीकर नागरिकांच्या वतीने SMW इस्पात कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आलेल्या निवेदनात प्रदूषणाविरोधात मागण्या करण्यात आल्या असून, चिमणीतून उत्सर्जित होणारी जीवघेणी काळी राख पुढील ७ दिवसांच्या आत १००% बंद करावी, असा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यासोबतच, प्रदूषणामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे आणि ज्या नागरिकांचे सोलर पॅनल निकामी झाले आहेत, त्यांना कंपनीने त्वरित योग्य ती आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी रेटून धरण्यात आली आहे. हवेची गुणवत्ता स्पष्टपणे कळावी यासाठी देवळी शहराच्या मुख्य भागात आणि कंपनीच्या प्रवेशद्वारावर ‘रिअल-टाइम एअर क्वालिटी इंडेक्स’ दर्शविणारे डिजिटल बोर्ड लावण्यात यावेत आणि प्रदूषित हवेमुळे आजारी पडलेल्या नागरिकांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च कंपनीने आपल्या ‘CSR’ निधीतून करावा, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.जर ७ दिवसांत ठोस सुधारणा झाली नाही, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कंपनीचा ‘कन्सेन्ट टू ऑपरेट’ परवाना रद्द करण्याची मागणी करून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा किरण ठाकरे यांनी यावेळी दिला. या मोर्चात देवळी शहरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला आणि शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा धडक मोर्चा नगराध्यक्ष किरण ठाकरे यांचे नेतृत्वात काढण्यात आला. या मोर्चामध्ये प्रविण कात्रे, गौतम पोपटकर, डॉ. इंद्रप्रसाद फुटाणे, डॉ. सचिन तडस, अशोक पवार, प्रमोदराव ठाकरे, दादारावजी मुन, समीर सारजे, गौरव खोपाळ, प्रविण खाडे, दिलीप वाघमारे, आतिष ढोक, मंगेश वानखेडे, सुमित झोरे, तुषार गोल्हर, हारून तंवर, गंगाधरराव लाकडे, मनोहरराव खाडे, एकनाथराव कांबळे, स्वप्नील ठाकरे, निखिल काशीकर, सरपंच संदिप दिघीकर, सरपंच विनोद दांदडे, दिलीप बाळबुधे, सुधीर भगत, मनीष पेटकर, गणेश धोंगडे, अमोल झाडे, सतीश राऊत, असिफ शेख, इरफान शेख, समीर यावलकर, अक्षय ठाकरे , अविनाश धुर्वे, धनराज घुबडे, सागर पाटणकर, शिल्पा मुरार, स्वाती खाडे, राजी लिचडे, सविता घुबडे, भारती झोरे, वनिता खाडे, आकोटकर ताई, मोनिका खाडे, स्वाती धांदे व इतर अनेक नागरिकांची उपस्थिती होती.






