नगराध्यक्ष किरण ठाकरे यांचा गंभीर आरोप

देवळी सत्यदूत वृत्त रेणुका दुरबुडे

देवळी- नगर परिषदेत सध्या प्रशासनातील गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, नगराध्यक्ष कोणतेही चुकीचे अथवा बेकायदेशीर काम करण्यास नकार देत असल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लेखणीबंद आंदोलन करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप किरण ठाकरे यांनी केला आहे.नगराध्यक्षांनी नेहमीच नगर परिषदेमधील कामकाज पारदर्शक व नियमांनुसार व्हावे, यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य किंवा चुकीचे काम करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. मात्र या प्रामाणिक भूमिकेमुळे काही अधिकारी आणि कर्मचारी नाराज झाले असून त्यांनी प्रशासनावर दबाव आणण्याच्या हेतूने लेखणीबंद आंदोलन सुरू केल्याचे समोर येत आहे.नगर परिषद ही जनतेच्या सेवेसाठी असलेली संस्था असल्यामुळे नगर परिषदेचे कार्यालय तळमजल्यावर स्थलांतरित करण्याबाबत दोनच दिवसांपूर्वी नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले होते हे विशेष. अशा प्रकारच्या लेखणीबंद आंदोलनामुळे शहरातील नागरिकांची कामे ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य तो निर्णय घेऊन परिस्थिती सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.तसेच या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून जर मुख्याधिकारी जाणीवपूर्वक प्रशासनात अडथळे निर्माण करत असेल, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी केली आहे.नगराध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर काही कागदपत्रांची तपासणी केल्यावर नियम डावलून अनेक चुकीचे कामे झाल्याचे माझ्या लक्षात आले आहॆ. प्रशासकीय काळात मुख्याधिकाऱ्यांनी अनेक नियमबाह्य कामे केल्याचे समोर आले आहॆ.नियम डावलून ले आउट ला परवानगी देणे, नियमबाह्य पद्धतीने ठेकेदारांचे बिल काढणे, न.प. हायस्कुल च्या मैदानावर नियम डावलून बांधकाम करण्याकरिता NOC ना हरकत प्रमाणपत्र देणे, नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती नाजूक असतांना मुख्यालयी वास्तव्यास न राहता अपडाऊन करण्याकरिता नगर परिषदेच्या खर्चातून फोर-व्हीलर गाडी वापरणे असे अनेक आरोप नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी केले आहॆ. न.प. उपाध्यक्ष राहुल चोपडा व बहुमतात असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे समर्थन असल्यामुळे व मी एकटा असल्यामुळे मुख्याधिकारी माझा वारंवार अपमान करीत असल्याचा आरोप सुद्धा नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी केला आहॆ. कोणतेही कागदपत्र नगराध्यक्षांना दाखवू नये असा अलिखित आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी मला खासगीत सांगितल्याचे ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. काहीही झाले तरी जनतेने मला स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्याकरिता निवडून दिले आहॆ त्यामुळे जोपर्यंत मी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर आहॆ तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत चुकीचे काम होऊ देणार नाही व नियमबाह्य पद्धतीने नागरिकांचे हक्क अधिकार डावलू देणार नसल्याचे किरण ठाकरे यांनी सांगितले.






