देवळी सत्यदूत वृत्त.
सचिन वैद्य

वर्धा : वर्धा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू (रेती) उत्खनन व अवैध वाहतुकीवर तात्काळ आळा घालावा, तसेच सर्व रेती घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले असतानाही वर्धा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. काही ठिकाणी बोट, जेसीबी व पोकलँड यांसारख्या यंत्रसामग्रीचा वापर करून नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा केला जात असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, गुंडगिरीच्या घटना वाढत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडल्यामुळे परिस्थिती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात आले.
तसेच, वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून, त्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याने शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. अतिरेक उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यंत्रसामग्रीमुळे होणाऱ्या ऑईल व डिझेल गळतीमुळे जलचर जीवांना धोका निर्माण होत असून, नदीलगतच्या गावांमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर सर्व रेती घाटांवर तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, प्रत्येक घाटावर शासकीय अधिकारी/कर्मचारी नियुक्त करणे, मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करणे, बेकायदेशीर यंत्रसामग्रीचा वापर त्वरित बंद करणे, तसेच अवैध वाळू वाहतूक थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आणि नदी पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
सदर मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या वेळी वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे, पुलगाव शहर प्रमुख राकेश कचवाह, विधानसभा प्रमुख नरेश ठाकूर, शहर संघटक प्रकाश मेटे, हनुमंत बोन्द्रे, युवासेना तालुका अधिकारी रोहित निगम, अॅड. विद्याधर माथाने, नरेश कलमकर, सुधाकर किल्लोर, साहिल दळवी, हरीश राउत, बाबराव पवार, बबलू हरदाय्या, अकील शेख यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.







